सोलापुरात ८ दिवसांत १७० कोटींच्या वाहनांची विक्री! पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ३५०० वाहनांची विक्री; २०१८ दुचाकी, ६४० कार, १५३ ट्रॅक्टरसह अन्य वाहनांची विक्री
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घर खरेदी, दागिने खरेदीसाठी नागरिकांची मागच्या आठ दिवसांपासून लगबग सुरू होती. सोलापूर व अकलूज आरटीओ कार्यालयाकडील नोंदीनुसार आठ दिवसांत जिल्ह्यात तब्बल साडेतीन हजार वाहनांची विक्री झाली आहे.
नुसत्या वाहन व्यवसायात तब्बल १७० कोटींची उलाढाल झाली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. या शुभमुहूर्तावर बाजारपेठांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत खरेदीसाठी रविवारी (ता. ३०) ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सोन्याचा भाव महागला, तरीदेखील २२ आणि २४ कॅरेट दागिन्यांच्या खरेदीसाठी सराफ दुकानांमध्ये खरेदीची सकाळपासूनच लगबग होती. दागिन्यांच्या व्यवसायातही कोट्यवधींची उलाढाल झाली. चारचाकी, दुचाकी वाहनांमध्ये वेगवेगळे मॉड्यूल आले असून आरामदायी प्रवासासाठी दोन हजारांहून अधिक दुचाकी तर साडेसहाशे चारचाकी वाहनांची खरेदी मागच्या आठ दिवसांत झाली आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांसोबत इलेक्ट्रीक गाड्यांची देखील खरेदी झाली. शेतकऱ्यांनीही मशागतीच्या निमित्ताने ट्रॅक्टर खरेदी केले.
दरम्यान, अनेक कंपन्यांच्या चारचाकी वाहनांसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने अनेकांनी मागच्या आठ दिवसांपूर्वीच गाड्यांचे बुकिंग केले होते. दुसरीकडे प्लॉट, फ्लॅटची बुकिंग देखील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झाली. अनेक गृहप्रकल्प उद्योजकांनी या मुहूर्तावर ग्राहकांच्या हाती घराच्या चाव्या सोपविल्या तर अनेक ठिकाणी नव्या प्रकल्पाची बुकिंग देखील सुरू झाली. अनेक ग्राहकांना आता घर हस्तांतरासाठी रामनवमी व अक्षय तृतीयेचा मुहूर्त दिला गेला आहे. वाहनांची विक्री अशी…..
दुचाकी २०१८
चारचाकी कार ६४०
ट्रॅक्टर : १५३
मालवाहतूक वाहने : २३६
प्रवासी वाहने ८५
अन्य : ३७६
Leave a Reply