आषाढी वारी काळात ‘व्हीआयपी’ दर्शन पास दिल्यास कारवाई; पंढरीत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

आषाढी वारी काळात ‘व्हीआयपी’ दर्शन पास दिल्यास कारवाई; पंढरीत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रखुमाईचे ‘व्हीआयपी’ दर्शन पास दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना याबाबत त्यांनी पत्राद्वारे आदेश दिला आहे. या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्री, आमदार, खासदार, अधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने ‘व्हीआयपी’ पास घेऊन दर्शन घेतात. परिणामी दर्शनरांगेतील भाविकांना मात्र तासन् तास थांबावे लागते.

आषाढी यात्रा काळात रोज हजारो भाविक पंढरीत दाखल होत असतात. एकादशीच्या आसपास तर ही संख्या लाखोंच्या घरात जाते. गर्दीमुळे भाविकांना दर्शनासाठी अनेक तास रांगेत उभे राहावे लागते. त्यातच ‘व्हीआयपी’, ओळखीने दर्शन घेणाऱ्या भाविकांमुळे दर्शनासाठी तिष्ठत राहण्याचा काळ वाढतो. हे होऊ नये यासाठी या यात्रा काळात ‘व्हीआयपी दर्शन सेवा बंद केली जाते. तरीही अनेकदा मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी, राजकीय कार्यकर्ते हे थेट प्रवेश देण्याची मागणी, विनंती करतात. प्रसंगी दबाव टाकतात. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी वरील आदेश काढला आहे.

आदेशात म्हटले आहे, की आषाढी यात्रेच्या काळात लाखो भाविक येत असतात. यामध्ये सामान्य भाविकांना दर्शनासाठी खूप वेळ रांगेत थांबावे लागते. असे असतानाही ‘व्हीआयपी’ दर्शन पास घेत अनेक जण मध्येच घुसतात.

राज्य शासनाच्या विधी व न्याय खात्याने २०१० मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार, सण-उत्सव व यात्रा काळातील प्रमुख दिवसांत विशेष दर्शन व्यवस्थेस मनाई आहे. या शासन निर्णयाप्रमाणे
व्हीआयपी दर्शन बंद ठेवावे व दर्शन रांगेचे सुयोग्य नियोजन करून भाविकांची सोय करावी, अशी सूचना आशीर्वाद यांनी केली आहे. याचे उल्लंघन केल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *