७० फूट भाजी मंडई विक्रेत्यांच्या प्रश्नी उपमुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट आश्वासन; मुख्यमंत्री घेराव आंदोलन मागे
सोलापूर, दि. ३ जुलै २०२५ —
७० फूट भाजी मंडईतील भाजीपाला, फळ विक्रेते आणि फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनलेला असून, मागील तब्बल ३० दिवसांपासून त्यांचा व्यवसाय बंद आहे. याबाबत पालकमंत्री, महापालिका आयुक्त (सोमपा) यांना निवेदन दिले गेले, चर्चाही झाली आणि मोर्चाही काढण्यात आला. मात्र तरीही प्रश्न मार्गी लागलेला नाही.
या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचा आषाढीवारीसंदर्भात पंढरपूर दौरा असताना, सोलापूर विमानतळावर लाल बावटा फेरीवाले चारचाकी, खोकेधारक श्रमिक संघटना (सीटू संलग्न) यांच्या वतीने शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले. शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (आडम मास्तर), संघटनेच्या अध्यक्षा मा. नलिनीताई कलबुर्गी, ॲड. अनिल वासम, शांताबाई कोळी यांचा समावेश होता.
विक्रेत्यांनी मांडलेल्या वस्तुस्थितीची गंभीर दखल घेत मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिले की,
“७० फूट भाजी मंडईतील विक्रेते सध्या ज्या जागेवर आपला व्यवसाय करत आहेत, त्या जागेवरच ‘जैसे थे’ स्वरूपात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर नवनिर्वाचित महापौर व महापालिका सभागृहात निर्णय होईपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाईल.” तसेच, याबाबत सोलापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
या ठोस आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर, दिनांक ६ जुलै २०२५ रोजी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा संघटनेचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती कॉ. नरसय्या आडम यांनी दिली.
या निवेदन कार्यक्रमात जिल्हाधिकारी मा. कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे अंजनी शर्मा व वीरेंद्रसिंह यांच्या समन्वयामुळे हे शिष्टमंडळ मा. उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकले.
Leave a Reply