‘गेमिंग’मध्ये फसला, लुटीचा खेळ रचला ! -लोकमंगल’च्या शाखाधिकाऱ्याचा बनाव, २५ लाख हडपण्याचा प्रयत्न
-नळदुर्ग/धाराशिव : लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील शाखाधिकाऱ्याने लूट झाल्याचा बनाव करीत २५ लाख रुपये हडप केल्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या घटनेचा छडा लावला.
कैलास मारुती घाटे (वय ३३) असे या शाखाधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने स्वतःच्या फायद्यासाठी सोसायटीचे २५ लाख रुपये दडवून ठेवल्याचे उघड झाले आहे. -लोकमंगल’च्या येथील शाखेत शाखाधिकारी म्हणून कैलास घाटे कार्यरत आहे. ३० जूनला सायंकाळी तो दुचाकीने (एमएच-१३, बीयू-५०१९) सोलापूर येथील मुख्य कार्यालयात २५ लाख रुपये भरण्यासाठी निघाला होता.
सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील चापला तांड्याजवळ पाठीमागून येणान्या दुचाकीवरील दोघांनी ओव्हरटेक करून घाटे याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यामुळे घाटेने लगेच दुचाकी थांबविली. तेव्हा दोघांनी त्याची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार केला असता, त्यांनी घाटेवर शस्त्राने वार केले व २५ लाख रुपये असलेली बॅग घेऊन पोबारा केला, अशा आशयाचा जबाब घाटेने पोलिसांना दिला होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरवात केली.
स्वत:च करून घेतले वार
चोरट्यांनी नव्हे तर स्वतःच स्वतःच्या अंगावर वार करून घेतल्याचेही घाटेने पोलिसांसमोर कबूल केले. नळदुर्ग पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घाटे याची नळदुर्ग शाखेतून बाहेर पडण्याची वेळ व लुटीची वेळ यातील फरक, शरीरावरील जखमा, मिरची पूड टाकली असेल, तर दिसणान्या खुणा आदींमध्ये पोलिसांना तफावत आढळली.
घाटला अटक, रक्कमजप्त
“घाटे हा ऑनलाइन गेमिंग आणि जुगारामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याचे
गुन्हे शाखेने केलेल्या गोपनीय तपासात आढळले आहे. ऑनलाइन गेमिंगमध्ये मोठे नुकसान झाल्याने घाटे कर्जबाजारी झाला आहे. या माहिती आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याच्याकडे चौकशी केली असता, घाटे याने आर्थिक अडचणींमुळे बँकेतील २५ लाख रुपयांची रोख रक्कम तुटली गेल्याचा बनाव केला.
त्यासाठी स्वतःच स्वतःवर वार करून घेतले. तसेच रक्कम लपवून ठेवली होती. ती जप्त करण्यात आली असून घाटेला अटक केली आहे. या गुन्ह्यात अद्याप इतर कोणाचाही सहभाग आढळलेला नाही. त्याबाबत तपास सुरू आहे”, अशी माहिती पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी बुधवारी (ता. दोन) पत्रकार परिषेदत दिली.
Leave a Reply