महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यावर अभ्यासक्रम सुरु करणार: कुलगुरु डॉ. महानवर
सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासनाची बैठक!
सोलापूर, दि. 4- महात्मा बसवेश्वर यांचे मानवतावादी कार्य समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासनाच्यावतीने महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि कार्यावर आधारीत अभ्यासक्रम सुरु करणार असल्याचे कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन सल्लागार समितीची बैठक विद्यापीठाच्या राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब व्यवस्थापन परिषद सभागृहात कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला प्र-कुलगुरु प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वसंत कोरे, महात्मा बसवेश्वर अध्यासनाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर उपस्थित होते.
यावेळी बैठकीत महात्मा बसवेश्वर अध्यासनाच्यावतीने अल्पकालावधीचे विविध अभ्यासक्रम तयार करणे आणि हे अभ्यासक्रम सर्व इच्छुकांना उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन आणि विचारावर आधारित असलेली ग्रंथ संपदा संकलीत करुन कायमस्वरुपी जतन करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच ग्रंथाचे मराठी, कन्नड आणि इंग्रजीमध्ये अनुवाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा बसवेश्वर विश्वसंवाद सदन आणि महात्मा बसवेश्वर आयुर्वेदिक उद्यान निर्माण करण्यासाठी प्र-कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यावर आधारीत व्याख्याने, चर्चा, कार्यशाळा यांचे आयोजन करणे तसेच अध्यासन केंद्राच्या वतीने श्री सिध्देश्वर देवस्थान आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध संस्था महाविद्यालयासोबत सांमजस्य करार करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी दिली
यावेळी जेष्ठ समाजसेवक हेमंत हरहरे यांनी सर्व उपक्रमाचे कौतुक केले व सामाजिक प्रबोधनासाठी अध्यासन कार्य करत असल्याचे नमूद केले. बैठकीला महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे सदस्य प्राचार्य गजानन धरणे, महादेव न्हावकर, स्वाती महाळंक, सुरेश शहापूरकर, राहुल पावले आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन सल्लागार समितीची बैठक कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्र-कुलगुरु प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वसंत कोरे, महात्मा बसवेश्वर अध्यासनाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर.
Leave a Reply