सोलापूर ; घंटागाडी कर्मचाऱ्यांचे अखेर संप मागे
सोलापूर : महापालिकेच्या घंटागाडीवरील कामगारांनी किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप महापालिका प्रशासन, मक्तेदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये यशस्वी वाटाघाटी झाल्याने संप मागे घेतला आहे. किमान वेतनासह पगारी सुट्टी देण्याच्या अटीवर संप मागे घेण्यात आला. यासाठी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी मध्यस्थी केली.
घंटागाडीवरील चालक, सहाय्यक यांनी मक्तेदाराच्या विरोधात असंतोषाचे धोरण स्वीकारत बुधवारपासून (दि. 4) कामबंद आंदोलन सुरू केले होते. मक्तेदार किमान वेतनानुसार वेळेवर वेतन देत नाही. अनेक कामगारांचे वेतन प्रलंबित आहेत. वेतनामध्ये मोठी कपात केली जात सल्याचा आरोप कामगारांकडून केला गेला. बुधवारी सकाळच्या सत्रात जुळे सोलापुरातील पाण्याच्या उंच टाकीवर शोले स्टाईल आंदोलन केले. दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन केले.
गुरुवारी (दि. 5) रात्री उशिरा अतिरिक्त आयुक्त रवी पवार, मक्तेदार आणि कामगारांची बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी मक्तेदारांना वेतनामध्ये करत असलेली चूक निदर्शनास आणून दिली. मक्तेदार आणि कामगार या दोघांच्या चुकीमुळे हे आंदोलन सुरू झाले. मक्तेदाराने वेतन कपात बंद करावी. सुटी हा कामगारांचा हक्क आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशीचा पगार दिलाच पाहिजे, अशा स्पष्ट सूचना दिल्या. पगार वेळेवर न दिल्यास मक्तेदारांचा मक्ता रद्द होणार आहे. सध्या त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.
यामुळे उडाला गोंधळ
सध्या घंटागाडीमध्ये गुगल मॅप आहे. एक घंटागाडी किमान सात तास फिरली पाहिजे तरच मक्तेदाराचे बिल अदा केले जाते. मात्र घंटागाडीवर कर्मचारी भंगार गोळा करण्यासाठी एकाच ठिकाणी अनेकवेळ थांबून असल्याने नियमाप्रमाणे सात तास फिरत नाही. परिणामी मक्तेदाराचे बिल कपात होते ती कपात मक्तेदार कर्मचान्यांच्या पगारीतून करत असल्याने हा गोंधळ उडाला होता.
Leave a Reply