डायल 112 ला कॉल करून खोटी माहिती दिल्यास 1 वर्ष शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड

डायल 112 ला कॉल करून खोटी माहिती दिल्यास 1 वर्ष शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड

सोलापुरातील गणेश टेक्सटाईल्स, एमआयडीसी येथून डॉयल 112 ला कॉल करून ‘भावानं मर्डर केल्याची खोटी माहिती दिली’ पोलिसांनी शहानिशा केल्यावर अशाप्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाले. म्हणुन खोटी माहिती दिल्याप्रकरणी कॉल करणाऱ्या विनायक विलास गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार सोमनाथ वाघमारे हे 27 मार्च रोजी पीसीआर मोबाइल 1 मध्ये कर्तव्यावर होते. त्यांना मध्यरात्री रोजी 1.48 वाजता डायल 112 वरून कॉल आला की, ‘गणेश टेक्सटाईल्स, एमआयडीसी, सोलापूर येथे फोन करणारा व्यक्ती घटनास्थळी असून, त्याच्या भावाने मर्डर केला आहे’ त्यावर ते गणेश टेक्सटाईल्स, एमआयडीसी, सोलापूर येथे गेले. तेथे कॉल करणारा विनायक विलास गायकवाड (रा. 129, निवारानगर, सिद्ध हनुमान मंदिराजवळ, सोलापूर) हा मिळून आला.

त्यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मीच डायल 112 ला कॉल केला होता, असे सांगितले. त्यानुसार त्याच्याकडे घटनेबाबत विचारणा केली. त्याच्या नातेवाइकांकडे चौकशी केली. मात्र, अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून संबंधित व्यक्तीने डायल 112 वर कॉल करून खोटी माहिती दिल्याने त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 217 प्रमाणे गुन्हा नोंदला आहे.

खोटी माहिती दिल्यास एक वर्षाची शिक्षा व दहा हजाराचा दंड
– कोणीही डायल 112 अथवा इतर कोणत्याही माध्यमातून खोटे कॉल करू नयेत, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊन संबंधितास 1 वर्षाचा कारावास किंवा दहा हजार रुपये दंड, अशी शिक्षा होऊ शकते. कोणीही अशा प्रकारचे कृत्य करु नये, असे आवाहन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी केले आहे.

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *