श्री वटवृक्ष मंदिरात गुरुवारी भक्तीभावात साजरा होणार गुरुपौर्णिमा उत्सव.
, दि.८/७/२०२५.अ.कोट)
गुरुवार दिनांक १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा असुन येथील श्री वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमेस अनन्य साधारण महत्व असल्याने गुरुवारी गुरुपौर्णिमा उत्सव येथे सालाबादा प्रमाणे यंदाही मोठ्या भक्ती भावाने संपन्न होणार असल्याची माहिती श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.
पुढील विस्तृत माहिती देताना इंगळे यांनी येथे येणारे भाविक स्वामींना गुरु मानून या दिवशी दर्शनाकरीता विशेष गर्दी करतात. गुरुंचे गुरु, सदगुरुंचे गुरु तथा गुरुंचा महिमा म्हणजे येथील वटवृक्ष निवासी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय. अशा या पावन गुरुपौर्णिमेनिमीत्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी ठिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, मंदीरात येणेसाठी एक रस्ता, बाहेर जाणेसाठी एक रस्ता, दोन ठिकाणी चप्पल स्टँड, मंदिर परिसरात प्रवेश करताच भाविकांसाठी साऊंड सिस्टीमवर स्वामींच्या भक्तीगीतांचे वादन, विशेष दर्शन रांगेचे नियोजन, पाऊसा पासून संरक्षणा करीता दक्षिण महाद्वार ते गेटपर्यत पत्राशेड उभा करण्यात आले आहे. गुरुपौर्णिमेदिवशी वटवृक्ष मंदिरात नित्य नियमाने होणारी काकडआरती पहाटे ४ वाजता होईल. यानंतर पुरोहित मोहनराव पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते गुरुपुजन होईल. तत्पूर्वी सालाबादाप्रमाणे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता व भाविकांना स्वामी दर्शन सुलभतेने होणेकरीता मंदीराचे महाद्वार गुरुपौर्णिमेरोजी रात्री २ वाजता उघडण्याचा व गर्दीच्या अनुषंगाने मंदीरात स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय मंदीर समितीने घेतला आहे. भाविकांनी अभिषेकाची पावती केल्यास प्रसाद मिळेल. सकाळी ११:३० वाजता नियमीतपणे संपन्न होणारी महानैवेद्य आरती गुरुपौर्णिमेरोजी सकाळी १०:३० वाजता संपन्न होईल. दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी- गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे सर्व स्वामी भक्तांसाठी भोजन महाप्रसादाची सोय देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. दर गुरुवारी रात्री ८ वाजता मंदीरात साजरा होणारा श्रींचा पालखी सोहळा गुरु पौर्णिमेरोजी रात्री ७ वाजता संपन्न होईल
व यानंतर लगेच शेजारती संपन्न होईल याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी. येणाऱ्या स्वामी भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा, सेवेचा व भोजनप्रसादाचा व मंदीरातील श्रींच्या पालखी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा मा. नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.
Leave a Reply