सोलापूरात अंगणवाडी सेविकेची गळफास घेऊन आत्महत्या..
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील एका अंगणवाडी सेविकेने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली आहे.
निलावती प्रभाकर कोळी (वय ४०, रा. भंडारकवठे) असे आत्महत्या केलेल्या अंगणवाडी सेविकेचे नाव आहेत. निलावती कोळी या त्यांची आई अन्नपूर्णा मारुती कमळे यांच्याबरोबर सोमवारी गोविंदपूर (ता. चडचण, कर्नाटक) येथे नातेवाइकाच्या लग्नासाठी गेल्या होत्या. भंडारकवठेच्या एका अंगणवाडीमध्ये त्या अंगणवाडी सेविका असल्याने त्यांना आईने काल सायंकाळी गावी परत पाठवले होते. रात्री घरी पोहोचली का म्हणून फोन केला. मात्र फोन लागत नव्हता. आज मंगळवारी दुपारी तीन वाजता भंडारकवठे येथील घरी लग्नकार्य उरकून आई अन्नपूर्णा कमळे आल्या. तेव्हा
घराचा दरवाजा बंद होता. दरवाजा ढकलून आतल्या खोलीत जाऊन पाहिले असता मुलगी निलावती हिने साडीने गळफास घेऊन पत्र्याच्या वाशाला लटकत होती. गळफास काढून खासगी वाहनातून मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात आणले तेव्हा डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
मयत निलावती कोळी यांचे हालहळ्ळी (ता. अक्कलकोट) येथील प्रभाकर कोळी यांचेशी लग्न झाले होते. मात्र कावीळ झाल्याने त्यांचे निधन झाले होते. यामुळे निलावती कोळी या माहेरी भंडरकवठे येथे आईकडेच राहत होत्या. आई अन्नपूर्णा मारुती कमळे यांनी मंद्रूप पोलिसात याची खबर दिली. त्यानुसार अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी केली असुन मयत निलावती कोळी हिचा मृतदेह मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे .
सदर घटनेचा अधिक तपास मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शहानूर मुलाणी करीत आहेत.
Leave a Reply