एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू होण्यापूर्वीच गैरकारभाराबद्दल धर्मादाय आयुक्तांचे चौकशीचे आदेश. -रक्षकच बनले भक्षक.

एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू होण्यापूर्वीच गैरकारभाराबद्दल धर्मादाय आयुक्तांचे चौकशीचे आदेश. -रक्षकच बनले भक्षक.

कार्यकारी मंडळातील भ्रष्ट व अकार्यक्षम कारभार, घराणेशाही व व्यावसायिकांच्या घुसखोरीमुळे हॉस्पिटलचे अपरिमित नुकसान केल्याबद्दल डॉ .संदीप आडके यांनी केली तक्रार.

सोलापूर : 2009 सालापासून भ्रष्टाचारामुळे एन. एम. वाडिया चॅरिटेबल बंद स्थितीत असून गरीब व गरजू रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा देण्याचा ट्रस्टचा मुख्य उद्देश नष्ट झाल्याने हॉस्पिटलची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. सध्याचे भ्रष्ट व अकार्यक्षम कार्यकारी मंडळास त्यांनी केलेल्या नियमबाह्य भ्रष्ट कारभाराबद्दल कामकाजापासून ताबडतोब बरखास्त करावे. सदर हॉस्पिटल हे सरकारने ताब्यात घेऊन योग्य त्या धर्मादाय संस्थेस चालवण्यास द्यावे जेणेकरून येथील गरीब व गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात पुन्हा उपचार मिळू शकतील अशी तक्रार हॉस्पिटलमध्ये पूर्वी काम करणारे अस्थिरोग तज्ञ डॉ. संदीप आडके यांनी जिल्हाधिकारी, धर्मादाय उपायुक्त व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समिती यांच्याकडे केलेली असता त्यावर धर्मादाय आयुक्त यांनी तात्काळ रुग्णालयातील गैरकारभाराच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत.

सोलापूर व परिसरातील गरीब व गरजू रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा मिळण्यासाठी 1934 साले डॉ.विष्णू गणेश वैशंपायन यांनी एन. एम.वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट, सोलापूर याची स्थापना करून वरील हॉस्पिटल सुरू केले . या हॉस्पिटलचे बांधकाम व रुग्ण सेवा देण्यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी तसेच समाजसेवी संस्थांनी दिलेल्या दानातून 350 खाटांचे अतिशय अद्ययावत रुग्णालय वेगवेगळ्या विभागातील वैद्यकीय सेवा सप्टेंबर 2006 सालापर्यंत देत होते, परंतु हॉस्पिटल व ट्रस्टच्या व्यवस्थापनातील भ्रष्टाचार, गैरकारभार व अंतर्गत वादामुळे 2009 सालापासून हे हॉस्पिटल आज पर्यंत बंद स्थितीत आहे. या हॉस्पिटलमध्ये सर्व विषयांचे सीपीएस मुंबई यांचे डॉक्टरांचे पदविउत्तर अभ्यासक्रम, जी एन एम नर्सिंग कोर्स , सोलापुरातील सर्वप्रथम असलेल्या एमआरआय ,सिटीस्कॅन ,कार्डियाक कॅथ लॅब ,सी आर्म मशीन, कार्डियाक व न्यूरोसर्जरी व इतर ऑपरेशन थेटर्स, सुसज्ज आयसीयू ,एक्स-रे मशीन, लॅब , ओपीडी व आयपीडी विभाग अशी अनेक कोट्यावधी रुपयांची मशिनरी व विभाग हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते व त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील एक नावाजलेले हॉस्पिटल म्हणून त्याने नावलौकिक मिळवलेला होता. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स व स्टाफने आपल्या सेवाभावी वृत्तीने या रुग्णालयाची उभारणी व विस्तारीकरण केले. परंतु 2006 नंतर डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना पगार न देणे व संस्थेतील अकार्यक्षम व भ्रष्ट कार्यकारी मंडळाच्या कारभारामुळे 2009 पासून हॉस्पिटल पूर्णपणे बंद झाले . त्यामध्ये असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेल्या , कोर्सेस बंद पडले व गरजू व गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळणे बंद झाले. त्यावेळच्या सचिव असलेल्यांनी आर आर राठी यांनी हॉस्पिटल मधील बरीच यंत्रसामग्री व फर्निचर विकून हॉस्पिटलचे अतोनात नुकसान केले परंतु तत्कालीन व आजपर्यंत कार्यरत असलेले प्रेसिडेंट, प्रभाकर दत्तात्रय करंदीकर , पी आर दमानी व त्यांच्या कार्यकारी मंडळाने आपल्या अकार्यक्षम व भ्रष्ट कारभारामुळे हॉस्पिटलचे अपरिमित नुकसान केले आहे व लोकसहभागातून व धर्मादाय नावावर उभा केलेल्या हॉस्पिटलची माती केली आहे.
ट्रस्टच्या नियमाप्रमाणे या हॉस्पिटलचे प्रेसिडेंट हे एक डॉक्टर असणे अपेक्षित असताना असता पी डी करंदीकर हे या ट्रस्टचे प्रेसिडेंट म्हणून काम पाहत आहेत. ट्रस्टच्या अंतर्गत वादामुळे दि. 31/05/2018 रोजी माननीय जॉईंट चॅरिटी कमिशनर, पुणे यांच्या आदेशाप्रमाणे खरे तर सर्वच भ्रष्ट संचालक मंडळ बरखास्त करणे गरजेचे असताना फक्त सचिव आर आर राठी यांना 41/D कलमान्वये काढून टाकून तेथे शिरीष गोडबोले , डॉ.अनंत भागवत व अनिल बर्वे यांची ‘फीट पर्सन’ म्हणून व पुढील आदेशा पर्यंत करंदीकर व पी आर दमानी यांना फक्त मदत करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु दोनच महिन्यात नियमबाह्य पद्धतीने या तिघांना ट्रस्टच्या कार्यकारी मंडळात घेण्यात आले व शिरीष गोडबोले यांची मानद सचिव म्हणून दि. 25/07/2018 रोजी नियुक्ती करण्यात आली व त्यानंतर या संस्थेशी कोणतेही संबंध नसलेले तसेच संस्थेच्या नियमांना डावलून अनेकांना या संस्थेच्या कार्यकारी मंडळात समाविष्ट करण्यात आले. यातील बहुतांश मंडळी ही व्यापारी, व्यावसायिक, पूर्वीच्या विश्वस्तांचे नातेवाईक व स्वतःच्या लाभापोटी आलेली आहेत. गिरीश गोडबोले हे एक बांधकाम व्यवसायिक असून हॉस्पिटलच्या पूर्वीच्या कार्यकारी मंडळातील डॉ. आर .इ .गोडबोले यांचे चिरंजीव आहेत. डॉ. सुनील मेहता हे पूर्वीच्या कार्यकारी मंडळातील चेअरमन डॉ.महावीर मेहता यांचे चिरंजीव आहेत. यातून ट्रस्टमध्ये घराणेशाही चालू आहे हे स्पष्ट दिसत आहे. ट्रस्टीज व कार्यकारी मंडळातील अनेक सदस्य हे संस्थेच्या नियमांना डावलून टेंडर न काढता आपापल्या व्यवसायाच्या निगडित कामे करून पैसे लुटत आहेत. उद्योजक दुन्दरापू राम रेड्डी, एडव्होकेट नितीन हबीब यांनी नियमबाह्य पद्धतीने व अनैतिकपणे गोष्टी केलेल्या आहेत.या कार्यकारी मंडळाने ट्रस्ट ही आपली खाजगी मालमत्ता असल्यासारखा हॉस्पिटलचा वापर करून सोलापुरातील अग्रगण्य हॉस्पिटल विकून बंद पाडलेले आहे.बहुतांश व्यवहार नियमबाह्य पद्धतीने करून हॉस्पिटलच्या अनेक जुन्या इमारतींचे पाडकाम करून सामानाची विक्री केली आहे. तसेच 2024 मध्ये हॉस्पिटल मधील अत्यंत महागडे एम आर आय पासून कोट्यावधी रुपयांची सर्व मशिनरी व फर्निचर अक्षरशः भंगारात विकून हॉस्पिटलचे नुकसान करून अपहार केलेला आहे. हे व्यवहार करताना त्यांनी धर्मादाय आयुक्त यांची परवानगी घेतलेली नाही. संस्थेकडे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचे पी टी आर वर नोंद केलेली नाही.
बँकेमध्ये पैसे असताना सुद्धा 2006 पासून अनेक डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचे वारंवार मागणी करून लाखो रुपयांची थकीत वेतने व मानधन दिलेली नाहीत. या हॉस्पिटलमध्ये डॉ. संदीप आडके यांनी अस्थिरोग तज्ञ म्हणून 1999 ते 2006 पर्यंत वैद्यकीय सेवा दिलेली आहे. सप्टेंबर 2006 मध्ये हॉस्पिटलच्या गैर कारभारामुळे कर्मचाऱ्यांचे व डॉक्टरांचे वेतन व मानधन न देता सर्व सदस्य व ट्रस्टीजने हॉस्पिटलला वाऱ्यावर सोडून राजीनामे दिले होते व हॉस्पिटलची जबाबदारी झटकलेली असताना डॉ.संदीप आडके यांनी तेथील कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन एक महिनाभर हे हॉस्पिटल स्वखर्चाने चालवलेले आहे. त्यावेळेस तेथे काम करणारे व सध्या पुन्हा कार्यकारी मंडळात आलेले डॉक्टर्स व कार्यकारी सदस्यांनी हॉस्पिटल वाचवण्यासाठी कोणतेही उपाय केलेले नाहीत व आता पुन्हा हापापाचा माल गपापा करण्यासाठी ही सर्व स्वार्थी मंडळी हॉस्पिटल प्रशासनामध्ये पुन्हा जमलेली आहेत व हॉस्पिटल पुन्हा चालू करण्याच्या गोष्टी करत आहेत.
धर्मादाय रुग्णालयांच्या नियमाप्रमाणे गरीब व आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी दहा टक्के व निर्धन रुग्णांसाठी दहा टक्के खाटा राखीव ठेवून उपचार करणे व रुग्णालयाच्या उत्पन्नाच्या दोन टक्के निधी आयपीएफ फंडामध्ये जमा करणे या अटींचा 2009 सालापासून आजपर्यंत भंग केलेला आहे. परंतु हॉस्पिटल ने अनेक सरकारी योजनांचा फायदा घेतलेला आहे. कोविड काळामध्ये सोलापूर महानगरपालिकेने या हॉस्पिटल वर अडीच कोटी रुपये खर्च केलेले आहेत.
वाडिया हॉस्पिटलच्या गैरकारभाराबाबत तात्काळ उच्चस्तरीय कारवाई झाली तर हे हॉस्पिटल एका चांगल्या प्रशासनाखाली लवकरच सुरू होऊ शकते व त्यासाठी हॉस्पिटलच्या सध्याच्या भ्रष्ट कार्यकारी मंडळास दूर करून पुन्हा सुरू करण्यासाठी हॉस्पिटलच्या बाबतीत आत्मीयता असणाऱ्या सर्वांनी मला संपर्क साधून सहकार्य करावे असे आवाहन डॉ.संदीप आडके यांनी केलेले आहे.

माननीय महोदय/ महोदया, सोबत दिलेल्या वाडिया हॉस्पिटल च्या गैर्यकारभाराबाबतच्या धर्मादाय आयुक्तांच्या कारवाईबद्दलच्या बातमीस योग्य ती प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती.
धन्यवाद.

डॉ. संदीप आडके.
अस्थिरोग तज्ञ, आडके हॉस्पिटल,
सिव्हिल हॉस्पिटल शेजारी ,उत्तर सदर बजार ,सोलापूर -413003.
M:9822807007. .

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *