सोलापुरात रिक्षा फोडले: दमानी नगर भागातील घटना
दमानी नगर भागातील क्रांती नगरात समाजकंटकांनी घरासमोर लावलेली रिक्षा फोडली ! सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टवाळखोर कैद ! सोलापूर – ( प्रतिनिधी ) – दमानी नगर भागातील नव्याने होत असलेल्या वारकरी भवनासमोरील क्रांतीनगर येथे घरासमोर लावलेली रिक्षा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांनी दगड मारून फोडली आहे. रिक्षाच्या समोरच्या दर्शनी भागाची मोठी काच फुटून मोठे नुकसान झाले आहे. दगड मारणारे समाजकंटक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही अंशी दिसत आहेत. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू झाला आहे .एम. एच .१३, बी. व्ही.०९९८ असा त्या नुकसान झालेल्या रिक्षाचा क्रमांक असून रिक्षाचे मालक अनिल धायगुडे यांनी याबाबतची तक्रार बुधवारी सकाळी फौजदार चवळी पोलिसात दिली आहे.
वारकरी भवनासमोरील वळणाच्या चौकात या परिसरातील काही तरुण दररोज घोळका करून मित्रांसोबत गप्पा मारत बसतात .याचा आजूबाजूच्या घरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. मोठमोठ्याने ओरडणे, शिवीगाळ करणे,बेफाम वाहन चालविणे, मोबाईलचा आवाज मोठा करून गोंधळ घालणे, महिलांच्या घरांवर दगड टाकणे असा प्रकार अनेक दिवसांपासून या टवाळखोरांकडून सुरू आहे. मंगळवारी रात्री या ठिकाणी उभारलेल्या मुलांना गोंधळ करू नका ,असे सांगितल्याचा राग मनात धरूनच अनिल धायगुडे यांची रिक्षा फोडली असल्याचा आरोप करण्यात येत आहे .पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी आणि या टवाळखोरांचा व चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील महिलांनी केली आहे. क्रांतीनगर आणि परिसरातील मुले दररोज सायंकाळी या ठिकाणी जमा होतात. आपली वाहने स्वतःच्या घरासमोर उभी न करता या ठिकाणी उभी करून रस्त्याला आडकाठी आणून मोठ्याने गोंधळ करतात, अशा तक्रारी सुद्धा करण्यात आल्या आहेत. याच परिसरात चोऱ्यांचे सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याचाही बंदोबस्त पोलिसांनी करावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.
Leave a Reply