पंढरपुरातील आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे चौकात महर्षी वाल्मिकी संघाची घोषणाबाजी!

सोलापूर दौऱ्यावर असताना शिवसेना नेते संजय राऊत यांचे लक्ष आदिवासी कोळी जमातीच्या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न,
पंढरपुरातील आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे चौकात महर्षी वाल्मिकी संघाची घोषणाबाजी!

जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे स्मारक अशा विविध प्रश्नांवर आदिवासी कोळी समाजबांधव सध्या आक्रमक झाले आहेत. आज शिवसेना नेते संजय राऊत हे सोलापूर दौऱ्यावर असताना पंढरपुरातील आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे चौकात महर्षी वाल्मिकी संघाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांचे छायाचित्र हातात घेत जोरदार घोषणाबाजी करुन आपल्या समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडं संजय राऊत यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की, राऊत साहेब हे अभ्यासु नेते आहेत, दररोज ते राज्यातील विविध प्रश्नांवर परखडपणे आपले मत मांडतात. त्यांना आमची विनंती आहे की, ज्याप्रमाणे आपण इतर प्रश्नांवरून सत्ताधारी मंडळींना धारेवर धरता, त्याचप्रमाणे आमच्या आदिवासी कोळी जमातीच्या विविध प्रश्नांवर ही व्यक्त व्हा, आजचा एक दिवस आमच्या समाजासाठी द्या. गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत परंतु सत्ताधारी व विरोधक ही याकडे दुर्लक्ष करत आहेत. आज आपण आमच्या सोलापूर जिल्ह्यात आला आहात, आम्ही आपले फोटो हाती घेऊन आपले स्वागत करतो पण, साहेब जरा आमच्या प्रश्नांवर बोला, ते सोडवण्यासाठी एक परखड विरोधक म्हणून सत्ताधारी मंडळींना आमचे प्रश्न सोडविण्यासाठी धारेवर धरा. आपणास आमचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला सद्बुद्धी लाभो , हीच श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना.

यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *