दक्षिण’च्या विकासासाठी…काडादी यांना विजयी करा…..

दक्षिण’च्या विकासासाठी…काडादी यांना विजयी करा…..

माने,शिवदारे,हसापूरे, शेळके एकत्रित प्रचारात
गेल्या दहा वर्षांत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकासकामे झाली नाहीत. या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी धर्मराज काडादी यांच्यासारख्या विकासाची दृष्टी असणाऱ्या प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे. तेव्हा या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांना विजयी करावे, असे आवाहन माजी आमदार दिलीप माने यांनी केले आहे.
शुक्रवारी, हत्तूर या गावांचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील, सिकंदरताज पाटील, माजी सभापती भीमाशंकर जमादार, महादेव पाटील, अशोक देवकते, शिवानंद पाटील – कुडल, सूर्यकांत पाटील, राजशेखर भरले, रावसाहेब व्हनमाने, सोमनिंग कनपवडियार, बिळेणी पट्टेवडियार, नागप्पा गुंडू, अब्दुल ग.शेख, अमजद नदाफ, रावसाहेब व्हनमाने, शुकर सगरे आदी उपस्थित होते.
माने म्हणाले, धर्मराज काडादी यांना मानणारे हत्तूर हे गाव आहे. या मतदारसंघातून ते निवडणूक लढवत असल्याने सर्वांनी एक दिलाने, एक मनाने व प्रामाणिकपणाने काम करून काडादी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे. आम्ही सर्वजण काडादी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आमच्या सर्वांच्या मान्यतेनेच ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत हा एकीचा संदेश मतदारसंघात जावा, यासाठीच आम्ही गावभेट दौरा करीत आहोत. ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आपापसातील गैरसमज दूर करून काडादी यांच्या विजयासाठी ग्राम स्तरावर आणि तालुकास्तरावर तसेच शहरात राहणाऱ्यांनी मताधिक्य मिळवून देण्यासाठी नियोजन करावे असे त्यांनी आवाहन केले.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *