अक्कलकोटमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा

अक्कलकोटमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा

सोलापूर : अक्कलकोट शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या एसटी बस स्थानक परिसरात दक्षिणेच्या बाजूने रस्ता मोकळा सोडण्याच्या मागणीसाठी अलिकडेच काही कार्यकर्त्यांनी उपोषण केले होते. त्यास प्रत्युत्तर म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन घडविले.
अक्कलकोटचे भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या हिंदू जन आक्रोश मोर्चा हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. यानिमित्ताने अक्कलकोटमध्ये सामाजिक वातावरण तापले असून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विविध विकासकामे होत आहेत. यात जुने एसटी बस स्थानक पाडून सुमारे २९ कोटी रुपये खर्चाचे नवीन अद्ययावत बस स्थानक उभारले जात आहे. बसस्थानकाच्या भोवताली संरक्षण भिती उभारल्या जात असताना त्यात दक्षिणेकडे असलेल्या रस्त्याची पूर्वीपासून असलेली वहिवाट बंद न करता कायम ठेवावी, अशी मागणी आहे. तथापि, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा दक्षिणेकडील बाजूने रस्ता मोकळा सोडायला तीव्र विरोध आहे. एसटी बस स्थानकाची उभारणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी करण्यात येत असून कोणाला अतिक्रमणे थाटण्यासाठी नाही, अशी भूमिका घेत आमदार कल्याण शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातून त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी तथा अलिकडेच काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना शह देण्याचा डाव आखला गेल्याचे मानले जाते.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *