डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू; करमाळा येथील घटना; गुन्हा नोंदण्यास टाळाटाळ?
करमाळा येथे प्रसूतीदरम्यान डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा • मृत्यू झाला असून येथील विठ्ठल हॉस्पिटलचे डॉ. राम बिनवडे यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश करमाळा न्यायालयाने दिला
आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार करमाळा पोलिस ठाण्यात डॉ. बिनवडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण गाजत असतानाच करमाळा येथे असेच प्रकरण घडले आहे.
शीतल भाऊसाहेब करगळ (वय २८, रा. रायगाव, ता. करमाळा) असे मृत्यू झालेल्या गरोदर महिलेचे नाव आहे. याबाबत पती भाऊसाहेब करगळ यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी पत्नी शीतल करगळ ही गरोदर असल्यापासून करमाळा येथील विठ्ठल हॉस्पिटलचे डॉ. राम बिनवडे यांच्याकडे उपचार घेत होती. डॉक्टरांनी प्रसूतीच्या दिलेल्या तारखेवेळी ९ सप्टेंबर २०२४ रोजी ११.४५ वाजता मी माझ्या पत्नीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले. त्यानंतर बिनवडे यांनी तपासणी करून बाळाची आई व बाळाची तब्येत एकदम ठीक असून एक ते दीड तासात प्रसूती होईल, असे सांगितले.
परंतु बराच वेळ गेला तरी प्रसूती झाली नाही. यावेळी वेदना वाढू लागल्या. याबाबत डॉ. बिनवडे यांना विचारले असता त्यांनी बाळाची व आईची तब्येत ठीक असल्याचे वारंवार सांगितले. त्यानंतरही शीतलला मोठ्या वेदना होत होत्या. मात्र डॉ. बिनवडे यांनी याबाबत कसलीही माहिती नातेवाइकांना दिली नाही. शेवटी बिनवडे यांनी सिझरिंग करावे लागेल अन्यथा गुंतागुंत वाढत जाईल, असे सांगितले. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिझरिंग केले व बाळाला आमच्या ताब्यात दिले.
यावेळी शीतलचे ऑपरेशन कसे झाले? तिची तब्येत कशी आहे? असे डॉक्टरांना विचारले असता त्यांनी घाईघाईने तुम्हाला एकदा सांगितले ना पेशंट बरे आहे, पुन्हा पुन्हा विचारू नका, असे उत्तर दिले. शीतलच्या बाळाची शारीरिक स्थिती नाजूक असल्याने बालरोग तज्ज्ञ डॉ. करंजकर यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तर शीतलला ऑपरेशन थेटरमध्ये ठेवले. त्यामुळे शीतलच्या शारीरिक स्थितीबद्दल काळजी वाटू लागली. नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये कर्मचान्यांना वारंवार विचारणा करण्यास सुरवात केली. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता शीतलला ऑपरेशन थेटरमधून बाहेर आणले व शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव खूप झाला आहे. त्यामुळे तातडीने रक्त भरणे गरजेचे आहे. त्यासाठी प्लाझ्मा व रक्त घेऊन या, असे सांगितले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सहा बॅक रक्त पिशव्या व चार बॅग प्लाझ्मा आणून दिला. तरीदेखील शीतलची अवस्था नाजूक होऊ लागली. त्यावेळी बिनवडे यांनी नातेवाइकांना बोलून रुग्णाला पुढील उपचारासाठी बाहेर घेऊन जावे लागेल, असे सांगितले.
त्यांनी रुग्णाला अहिल्यानगर येथे मेककेअर हॉस्पिटलमध्ये नेऊ व त्या ठिकाणी पाच डॉक्टरांची टीम तैनात केली आहे, असे सांगितले. त्यानंतर रुग्णवाहिकेने शीतलला अहिल्यानगरला आणले. परंतु येथे हॉस्पिटलमध्ये रुग्णाला तातडीची सेवा मिळाली नाही. उलट तेथील डॉक्टरांनी दाखल करून न घेता बाहेर पाठवले. मेककेअर हॉस्पिटलमध्ये उपचार न मिळाल्याने एशियन नोबेल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले. या ठिकाणी शीतलचा मृत्यू झाला. डॉ. बिनवडे यांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे शीतल करगळ हिचा मृत्यू झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
गुन्हा नोंद करण्यास पोलिसांची टाळाटाळ
शीतल करगळ हिचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यास नातेवाईक गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे नातेवाइकांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने फिर्यादीचे म्हणणे ऐकून घेऊन डॉ. राम बिनवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पोपट टिळेकर करत आहेत.
दोन वेळा केली शस्त्रक्रिया
सिझरिंगची शस्त्रक्रिया झाल्यानंतर शीतलने आपल्या आईशी बोलत असताना
सांगितले होते की, डॉ. बिनवडे यांनी सुरवातीला केलेल्या ऑपरेशनचे टाके
उसवले होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा माझे ऑपरेशन केले. यावेळी मला खूप त्रास झाला. त्यात खूप रक्तही गेले होते.
Leave a Reply