राष्ट्रीय ग्राहक दिन

सोलापूर दिनांक 24 (जिमाका) : – जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी लावण्यात आलेल्या स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फित कापून केले. तसेच त्यांनी येथील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. व येथे येणाऱ्या नागरिकांना विविध शासकीय योजनेची सविस्तर माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ द्यावा, असेही त्यांनी सूचित केले.

               राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष प्रमोद गिरी गोस्वामी, सदस्या श्रध्दा बहिरट, ग्राहक तक्रार समितीचे अध्यक्ष शशिकांत हरिदास व सदस्य शोभना सागर, श्रीमती सीमा होळकर, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, आदि उपस्थित होते.

               यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह म्हणाल्या,  आपण एखादी वस्तु  बाजारातून खरेदी करतो, त्यावेळी वस्तुची  गुणवत्ता व दर्जा याकडे दुर्लक्ष करतो.  याचा फायदा उत्पादन करणाऱ्या कंपन्या घेतात.  बऱ्याच तक्रारी ग्राहक न्यायालयात दाखल केल्या जातात.  परंतु त्याचा पाठपुरावा केला जात नाही. त्यामुळे न्यायापासून वंचित रहावे लागते.  यासाठी ग्राहकाने जागरुक राहिले पाहिजे.  एखादी वस्तु घेतली, त्याची पावती संबंधितांकडून घेऊन त्याची जपणूक केली पाहिजे. ती वस्तु खराब असेल तर अशा चुकीच्या गोष्टीबद्दल आवाजही  उठवला पाहिजे.   ग्राहक हक्क कायद्याविषयी प्रत्येकांना माहिती राहावी यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

        

       ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष प्रमोद गिरी गोस्वामी यावेळी म्हणाले, केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यासाठी Virtual Hearings & Digital Access to Consumer Justice संकल्पना निश्चित केली आहे.  या संकल्पनेमुळे ग्राहकाला न्याय मिळण्यासाठी मदत होणार आहे.  ही संकल्पना अतिशय चांगली असून  ग्राहकाच्या वेळेची संकल्पनेमुळे बचत होणार आहे.  कोरोना सारख्या महामारीमध्ये या संकल्पनेनुसार बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या होत्या.

               जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी प्रास्ताविकात  केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यासाठी Virtual Hearings & Digital Access to Consumer Justice संकल्पना निश्चित केली असल्याची माहिती दिली.  तसेच ग्राहक हक्क कायद्याने ग्राहकांना दिलेल्या हक्काची माहिती ही त्यांनी यावेळी सविस्तरपणे दिली.  सध्याचे डिजिटल युगात ऑनलाईन खरेदी ही ग्राहकाकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे तसेच या ठिकाणीही ग्राहकांची फसवणूक होऊ शकते तरी ऑनलाईन खरेदी विषयी ग्राहकांनी जागरूक राहिले राहण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

ग्राहक दिन बातमी

प्रभात फेरी-

 राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने ग्राहक जनजागृतीसाठी सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर तसेच एनसीसीचे विद्यार्थी यांच्या वतीने चार हुतात्मा पुतळा ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरापर्यंत ग्राहक प्रबोधन रॅली सकाळी नऊ पंचेचाळीस वाजता काढण्यात आली. रॅलीचा समारोप जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाला.

स्टॉल –

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर, वैद्यमापनशास्त्र यंत्रणा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सोलापूर, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, परिवहन विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग  विक्रीकर विभाग आदी विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आलेले होते.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *