पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सेडिबझ आणि एचसीएल सॉफ्टवेअरशी सामंजस्य करार!
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञानाबरोबर मिळणार प्रशिक्षण
सोलापूर, दि. 23- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञानाबरोबर प्रशिक्षण देण्यासाठी सेडिबझ ग्लोबल टेक्नाॅलाॅजी, पुणे आणि नोएडा येथील एचसीएल सॉफ्टवेअर या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी व विद्यापीठातर्फे कुलसचिव योगिनी घारे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
विद्यापीठाच्या राष्ट्रमाता जिजाऊ व्यवस्थापन सभागृहात झालेल्या कराराप्रसंगी प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, एचसीएल सॉफ्टवेअरचे असोसिएट व्हॉइस प्रेसिडेंट बाबुराज अय्यर, ग्रुप मॅनेजर योगीराज दामा आणि सेडिबझचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण देवलालकर, आनंद खळदकर, योगेश यावलकर, संदीप फत्तेपूरकर तसेच विद्यापीठातील डॉ. आर. एस. मेंते, विद्यापीठाचे कायदा अधिकारी ऍड. जावेद खैरदी, डॉ. सदानंद शृंगारे आदी उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अधिकाधिक संशोधन व प्रशिक्षण मिळावे, या हेतूने या दोन संस्थांशी करार करण्यात आले. सेडिबझ ही कंपनी कौशल्य विभागात वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी काम करते व त्यांना प्रशिक्षण देते. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून नोकरी मिळवण्यासाठी, एनर्जी विद्याचा प्लॅटफॉर्म वापरुन छोटे-छोटे कोर्सेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
एचसीएल सॉफ्टवेअर ही कंपनी मेक इन इंडिया, इंडस्ट्रीशी निगडित विविध सॉफ्टवेअर बनवते. सध्या विद्यापीठातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर बनवून देणे, त्यांना मार्गदर्शन करणे व प्रशिक्षण देणे या उद्देशाने हा करार झालेला आहे. ऑन जॉब ट्रेनिंगच्या उद्देशाने देखील या कराराचा फायदा होणार आहे.
फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने सेडिबझ ग्लोबल टेक्नाॅलाॅजी, पुणे आणि नोएडा येथील एचसीएल सॉफ्टवेअर या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला. यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, एचसीएल सॉफ्टवेअरचे बाबुराज अय्यर, योगीराज दामा आणि सेडिबझचे अधिकारी किरण देवलालकर, आनंद खळदकर व अन्य.
Leave a Reply