जिल्ह्यात मुळेगाव तांडा अन् पंढरपूरसह चार ठिकाणी धाडी वीस गुन्हे दाखल : एक्साईजची धडक मोहीम
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव व वडजी तांड्यासह जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस तालुक्यात ठिकठिकाणी धाडी टाकून तयार करण्यात येणारी हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये एकूण २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी पदभार घेतल्यानंतर हातभट्टी दारूच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. २१ ते २३ ऑगस्टदरम्यान त्या स्वतः पथकांसमवेत धाडसत्रात सहभागी झाल्या होत्या. धाींमध्ये पथकांनी दारू तयार करण्यासाठी लागणारे २८ हजार ४०० लिटर रसायन नष्ट करण्यात आले. एक हजार ५१५ लिटर हातभट्टी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. या प्रकरणी चार आरोपी फरार असून, १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क- अ व ब विभाग, भरारी पथक, पंढरपूर विभाग, माळशिरवस विभागाने ही मोहीम राबविली आहे.
मोहिमेदरम्यान देशी-विदेशी दारू व बिअर जप्त करण्यात आली आहे. नोंद केलेल्या गुन्ह्यांमध्ये एक चारचाकी कार व दोन मोटारसायकलचा समावेश आहे. या धाडसत्रांमध्ये १८ लाख ७५ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी उपअधीक्षक एस. आर. पाटील, निरीक्षक जगन्नाथ पाटील, अविनाश घाडगे, रामचंद्र चवरे, पंकज कुंभार पंढरपूरचे सुखदेव सिद्ध, समाधान शेळके, धनाजी पोवार, दत्तात्रय लाडके, मानसी वाघ, श्रद्धा गडदे आदींनी पार पाडली
Leave a Reply