परिवहन विभागातील सेवानिवृत्तांची थकीत तीन कोटींची रक्कम देणार
पालिका आयुक्तांचे कामगार महासंघाच्या बैठकीत आश्वासन
सोलापूर, दि. २८-महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील सेवानिवृत्त सेवकांची ग्रॅच्युईटी व इतर देय रकमांपैकी तीन कोटी रुपये डिसेंबर २०२५ अखेर टप्प्याटप्प्याने अदा करण्याचे आश्वासन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले. सोलापूर महानगरपालिका कामगार महासंघाचे अध्यक्ष माजी महापौर, अॅड. यू. एन. बेरिया यांच्या नेतृत्वाखाली कामगार पदाधिकाऱ्यांच्य बैठकीत आयुक्तांनी सेवानिवृत्त सेवकांच्या देय रकमेबाबत घोषणा
केली. परिवहन विभागातील सेवानिवृत्त सेवकांना दरमहा वेळेवर निवृत्तिवेतन देण्यात यावे, निवृत्त सेवकांपैकी वाहक व इतर प्रवर्गातील सेवकांना पुनर्नियुक्ती देणेस तसेच परिवहन विभागासाठी पूर्ण वेळ परिवहन व्यवस्थापक व इतर जरुर ते अधिकारी नियुक्त करण्याचे बैठकीत मान्य करुन तसे आदेश परिवहन व्यवस्थापक तथा सहआयुक्त यांना दिले. परिवहन विभागातील सेवानिवृत्त कामगारांना महागाई भत्ता देण्यासंदर्भात दोन महिन्यांनंतर आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. २००५ नंतर लागलेल्या सेवानिवृत्त
सेवकांना पेन्शन देणे, सातवे वेतन लागू करुन त्याचा फरक अदा करणे आदी आर्थिक मागण्यांबाबत नवीन बसेस आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. बैठकीच्या सुरुवातीस महासंघाचे अध्यक्ष अॅड. बेरिया यांनी परिवहन कामगार व सेवानिवृत्तांच्या होत असलेल्या हालअपेष्टा विषद करुन परिवहन
विभाग सक्षम करण्यास व सोलापूरच्या नागरिकांना प्रवासी सेवा देण्याबाबत योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, असे सुचविले. या बैठकीस कामगार महासंघाच्यावतीने सिद्राम उंबरजे, एन. एस. स्वामी, अनिल बागले, छगन बनसोडे, नागेश म्हेत्रे, अ. रजाक मकानदार, शिवा अजनाळकर, धनंजय कांबळे आदी कामगार प्रतिनिधी व प्रशासनातर्फे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहआयुक्त तैमूर मुलाणी तसेच गिरीश पंडित, मल्लिकार्जुन पडगानूर, गिरीश अंटद, बसवराज वांगी आदी उपस्थित होते.
Leave a Reply