मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे सोमवार, 14 ऑक्टोबर रोजी निधन झाले.
त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे मनोरंजन क्षेत्राला धक्का बसला आहे. ते 57 वर्षांचे होते.अतुल परचुरे यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मालिका, चित्रपट किंवा नाटक विश्वात स्वतःचा ठसा उमटवला होता. मराठीतच नव्हे तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांचं करिअर अत्यंत उत्तमरित्या सुरू असतानाच त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, या कठीण प्रसंगावर मात करत अतिशय जिद्दीने ते पुन्हा एकदा काम करण्यासाठी सज्ज झाले.
अनेक मराठी नाटकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना फारच भावल्या. त्यातही त्यांनी साकारलेली पुलंची भूमिका मराठी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. यासाठी त्यांचे खुद्द पु.ल. देशपांडे यांनी देखील कौतुक केले होते. कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली या नाटकांमधील त्यांच्या भूमिका चर्चेत राहिल्या. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातही त्यांनी बराच काळ काम केलं. अलिबाबा आणि चाळिशीतले चोर हा अतुल परचुरेंचा शेवटचा सिनेमा ठरला.
अतुल यांना मध्यंतरी कर्करोगाने ग्रासलं होतं. या कठीण काळात त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. तेव्हा त्यांचं वजन झपाट्याने कमी झालं होतं. या जीवघेण्या आजारातून ते सुखरुप बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी पुन्हा अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केलं. कामाला नव्याने सुरुवात करत असतानाच त्यांच्यावर उपचारही सुरू होते. झी नाट्य गौरव सोहळ्यादरम्यान अतुल यांची खास उपस्थिती होती.
कॅन्सरवर मात करुनही गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तब्येत पुन्हा बिघडली होती. त्यांना काही कॉम्प्लिकेशनला सामोरं जावं लागत होतं. नुकतीच त्यांनी ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकाची घोषणाही केली होती. जोमाने काम सुरु केलं होतं. मात्र तब्येतीने त्यांची साथ दिली नाही.
अतुल परचुरे यांनी नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही प्रकारांमध्ये आपली छाप पाडली होती. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून कधीही न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. एक अष्टपैलू अभिनेता, चांगला मित्र गमावल्याची भावना कलाविश्वातून व्यक्त होत आहे.
Leave a Reply