सोलापूर, दिनांक 24 (जिमाका)- श्री सिद्धेश्वर महायात्रा दिनांक 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत होत आहे. यात्रा कालावधीत संपूर्ण महिनाभर दररोज श्री सिद्धेश्वर मंदिर व होम मैदान येथील मनोरंजन नगरीमध्ये हजारो भाविक, नागरिक येत असतात. त्यामुळे या सर्व नागरिकांची सर्व प्रकारचे सुरक्षा तसेच यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुख तसेच सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी यांनी कृती आराखड्याप्रमाणे त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 अंतर्गत पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद . यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे, शहर पोलीस उपयुक्त डॉ. दिपाली काळे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, शहर पोलीस वाहतूक उपायुक्त सुधीर शिरवाडकर, उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांच्यासह पोलीस व संबंधित विभागाचे अधिकारी तसेच देवस्थान पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर व अक्षता सोहळा कार्यक्रमाच्या ठिकाणी हजारो भाविक उपस्थित राहतील, त्या दृष्टीने पोलीस विभाग, महापालिका व मंदिर समितीने गर्दीचे योग्य नियंत्रण करावे. तसेच या ठिकाणी भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी. संपूर्ण यात्रा कालावधीसाठी किती आराखड्याप्रमाणे प्रत्येक शासकीय विभागाने त्यांचा एक नोडल अधिकारी नियुक्त करावा व तो होम मैदान येथील कार्यालयात उपस्थित राहील याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सुचित केले.
होम मैदान येथे जे मनोरंजन नगरी निर्माण केली जाणार आहे त्या ठिकाणी येणारे स्टॉल धारक किंवा विक्रेते यांनी त्यांच्या स्टॉलची योग्य रचना ठेवावी सर्व स्टॉल सुटसुटीत असावेत गर्दीचे नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे मोकळी जागा ठेवावी. याबाबत महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलीस विभागाने अत्यंत दक्ष राहून कामकाज करावे. फूड स्टॉल जवळ अग्निरोधक सिस्टीम बसवावी व ही सिस्टीम हाताळण्यासाठी दोन ते तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. त्याप्रमाणेच आरोग्य विभागाने प्रथमोपचार केंद्र तसेच तात्पुरते रुग्णालय स्थापन करून त्या ठिकाणी नियुक्त वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची यादी प्रशासनाला सादर करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.
राज्य वीज वितरण कंपनी तसेच विद्युत निरीक्षक यांनी होम मैदानावर देण्यात येणारे विविध वीज जोडणी व्यवस्थित व सुरक्षेच्या दृष्टीने योग्य राहील याची खात्री करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व विक्रेत्यांचे स्टॉल व्यवस्थित आहेत याची खात्री करावी. मंदिर परिसर व होम मैदान येथे आपत्कालीन व्यवस्था कार्यान्वित करावी. होम मैदानावर स्वच्छता राहील तसेच धूळ उडणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी. दिनांक 12 ते 16 जानेवारी 2024 25 या कालावधीत होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमासाठी पुरेसा बंदोबस्त पोलीस विभागाने उपलब्ध करावा तसेच या कालावधीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही याची सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 अंतर्गत श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी तसेच सर्व शासकीय यंत्रणावर असलेली जबाबदारी याची माहिती देऊन प्रत्येक विभागाने जबाबदारी प्रमाणे आतापर्यंत केलेल्या कामकाजाची ह माहिती त्यांनी दिली. यात्रा कालावधीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत करावयाची कार्यवाही बाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
महायात्रा कालावधी-
श्री सिद्धेश्वर महायात्रा दिनांक 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत होत असून दिनांक 12 जानेवारी रोजी 68 लिंग प्रदर्शन, 13 जानेवारी रोजी अक्षता कार्यक्रम, 14 जानेवारी होम हवन असे कार्यक्रम होणार आहेत. तर पंच कमिटीचे सदस्य श्री. कस्तुरे व श्री. बिराजदार यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने यात्रा कालावधीत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. तसेच जवळपास दीडशे स्वयंसेवक उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगितले.
Leave a Reply