अरे व्वा! आजपासून ‘वॉररूम’ तेही पाणीपुरवठ्याचे ; महापालिकेचे डॅशिंग अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांची माहिती
पाणी सोडणाऱ्या महापालिकेच्या चावीवाल्यांवर नियंत्रण ठेवून शहरात पाण्याचे समतोल वाटप होण्यासाठी आजपासून पाणीपुरवठा वॉररूम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली.सोलापूर शहरास होणाऱ्या पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकारी, विभागीय कार्यालयाकडील अधिकारी, अभियंते तसेच चावीवाले यांच्या कामकाजातील समन्वयाच्या अभावामुळे शहरातील पाणी पुरवठ्याबाबत लोकांच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, लोकांना ठरवून दिलेल्या दिवशी (रोटेशन पद्धतीने) पाणी पुरवठा व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधींसह माजी सदस्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्यासंबधी येणाऱ्या तक्रारी सोडविण्याकरिता व शहरास शुद्ध व ठरवून दिलेल्या दिवशी पाणी पुरवठा होण्यासाठी इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर येथे पाणी पुरवठा वॉररूम तयार करण्यात आली आहे. ही वॉर रूम उपायुक्त किरणकुमार मोरे यांच्या नियंत्रणाखाली असणार आहे.
चावीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नियोजनाप्रमाणे शहराच्या प्रत्येक भागामध्ये त्या-त्या दिवशी, त्या-त्यावेळी पाणीपुरवठा झाला की नाही, याची परिपूर्ण माहिती घेतली जाणार आहे. जर वेळा चुकल्यास संबंधित चावीवाला व अधिकारी यांना जबाबदार धरले जाणार आहे. सांगूनही वारंवार चुका झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
Leave a Reply