सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधकांनी कंबर कसली, सत्ताधाऱ्यांची अडचण वाढली


राज्यात शेतमालाच्या विक्रमी आर्थिक उलाढालीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी विरोधकांनी आता चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे. सोलापूर बाजार समिती परिवर्तन पॅनलच्या वतीने आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यंदा बाजार समितीवर आपलाच झेंडा फडकवण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी उभा केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या पॅनलसाठी कंबर कसली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पॅनलमुळे नाराज काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांच्या घरोघरी जाऊन देशमुख हे भेटीगाठी घेत आहेत. यापूर्वीच त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना सोबत घेतले आहे. आता त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे, काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे महादेव चाकोते, सिद्धाराम चाकोते, काँग्रेसचे जेष्ठ नेते जाफरताज पाटील त्यांच्या घरी जाऊन पाठिंबा घेतला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी ही पाठिंबा दिला आहे.दरम्यान, शनिवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या राजवाडे चौकातील संपर्क कार्यालयात आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, बळीराम साठे, महादेव चाकोते, बाळासाहेब शेळके, सिद्धाराम चाकोते, डॉक्टर हवीनाळे, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांचे बराच वेळ गुप्त बैठक झाली. या बैठकीत बाजार समितीच्या निवडणुकीची व्यूव्हरचना ठरवण्यात आली आहे.
आमदार विजय देशमुख म्हणाले, बाजार समितीची निवडणूक ही शेतकऱ्यांची आहे सुभाष देशमुख यांनी उभा केलेल्या पॅनलमध्ये शेतकऱ्यांची मुलं उमेदवार आहेत. त्यामुळे येथे उपस्थित आम्ही सर्वांनी या पॅनलला पाठिंबा देऊन विजयी करण्याचा निर्धार केला आहे. मार्केट कमिटी आणि शेतकऱ्यांचे हित हवे असेल, या राज्य आणि केंद्र सरकारचे मदत हवी असेल, तर सुभाष देशमुख यांनी उभ्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पॅनल सोबत रहा असे आवाहन मतदारांना आमदार विजय देशमुख यांनी केले.
सुभाष देशमुख म्हणाले, माझ्या विनंतीला मान देऊन सर्व नेते या ठिकाणी एकत्र आले त्यांचे आभार मानतो. हे कार्यकर्त्यांचे पॅनल आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे, कार्यकर्त्यांना न्याय देणारे पॅनल असून त्यासाठी सर्व मतदार सोबत राहतील. आणि हे नेते आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
एकंदर सत्ताधाऱ्यांच्या वर्चस्वाला व बालेकिल्लाला भगदाड पाडण्यासाठी आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी चंग बांधला असून या पॅनलकडे आता सर्व नाराज नेतेमंडळी जमा होत आहेत त्यामुळे सदरची निवडणूक सत्ताधाऱ्यांना जड जाईल असे चित्र सध्या बाजार समितीच्या वर्तुळात दिसत आहे.
Leave a Reply