Solapur News : कारवाईस टाळाटाळ; मुलींसह महिलांचे उपोषण, पोलिसातील फिर्याद मागे घेण्यासाठी त्रास
सोलापूर : पोलिसांत दाखत फिर्याद मागे घेण्यासाठी त्रास देणाऱ्यांवर कारवाईचे पोलिस अधीक्षकांनी आदेश दिले. त्यानंतरही करमाळा पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत चिमुकल्या मुलींसह दोन महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. भाग्यश्री तानाजी पोळ व प्रतीक्षा अण्णासाहेब पोळ (रा. नागोबाचे शेटफळ, ता. करमाळा) या मंगळवारपासून (ता. ३) उपोषणास बसल्या आहेत. साहेबराव राजाराम पोळ, लहू साहेबराव पोळ, सोमनाथ मारुती पोळ, अजित राजाराम पोळ, शशिकांत आजिनाथ पोळ, लालासाहेब पोळ, प्रकाश लालासाहेब पोळ, तुकाराम पोळ यांना अटक करून चौकशी करावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यांनी २४ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्याविरुद्ध अन्यायाची फिर्याद दिली आहे. त्यामुळे संशयितांनी आठ मार्च रोजी त्यांच्या मालकीच्या शेतातील दोन एकर ऊस पेटवून दिला. करमाळा पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. त्यानंतर ११ मार्च रोजी त्यांच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करताना लहू याने चालकास पोलिसांत तक्रार देण्याची धमकी देऊन नांगरणी थांबवली होती. नऊवर्षीय मानसी अण्णासाहेब पोल, सहावर्षीय आराध्या अण्णासाहेब पोळ या दोघीं शाळेतून परत येताना चॉकलेटचे आमिष दाखवून व आत्याने बोलावल्याचे सांगून संशयितांनी त्यांना गाडीतून नेण्याचा प्रयत्न केला.
त्या गाडीत न बसल्याने त्यांना चापट मारली. त्यामुळे मुलींच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी कारवाईस पोलिसांनी टाळाटाळ केल्याने त्यांनी राज्यपाल यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केली होती. त्यानंतर जनता दरबारात पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधितांवर कारवाईचा तोंडी आदेश दिला होता. मात्र, त्यांच्याविरुद्ध अद्याप कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे फिर्याद मागे घेण्यासाठी त्रास देणान्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे.
Leave a Reply