‘राज्य उत्पादन’ची मोठी कारवाई! ‘सव्वा कोटीची हातभट्टी, विदेशी दारू जप्त’; आषाढीच्या पार्श्वभूमीवर ढाब्यांवरही लक्ष
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर- जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती अड्यांवर, अवैध ढाब्यांवर धडक कारवाई करीत १४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर कार्यालयाच्या पथकांनी १ जुलै रोजी कारवाई करीत नऊ हजार ५५० लिटर गुळमिश्रित रसायन, २३५ लिटर हातभट्टी, १९४ लिटर देशी दारू, ३० लिटर विदेशी दारू व ७८ लिटर बिअर आणि एक चारचाकी वाहन, असा मुद्देमाल जप्त केला आहे.
तत्पूर्वी, जून महिन्यात २७ वाहनांसह एक कोटी तीन लाख ३७ हजार २३८ रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. याशिवाय विनापरवाना अवैध मद्यविक्री करून मद्यपींची सोय करणाऱ्या २७ ढाबे चालकांवरही गुन्हे दाखल करण्यात
आले आहेत. निरीक्षक आर. एम. चवरे, जे. एन. पाटील, ओ. व्ही. घाटगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड यांच्या नेतृत्वातील पथकांनी ही कारवाई पार पाडली आहे.
आता हातभट्ट्या अन् ताडी विक्रेत्यांवर नजर
सोलापूर शहर परिसरात अवैध हातभट्ट्यांवर दारू बनविली जाते. याशिवाय ताडी विक्री देखील मोठ्या प्रमाणावर होते. या अवैध व्यक्तींविरुद्ध कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगितले. दरम्यान, अवैध मद्यविक्री, अवैध दारू निर्मिती व वाहतूक, याबद्दल कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकांवर किंवा ८४२२००११३३ या व्हॉट्स अॅपवर तक्रार करावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
Leave a Reply