मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारून महिलांचे संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज; लाभ वेळेत मिळत नाही, वाढीव लाभही नाही, वाचा….तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर जुलै ते डिसेंबर २०२४ पर्यंत वेळेवर लाभ मिळाला, पण सहा महिन्यांपासून लाभ वेळेत मिळत नाही. जूनचा लाभ अजून मिळालेला नाही.
तत्पूर्वी, योजनेच्या निकषांनुसार झालेल्या पडताळणीत राज्यातील दहा लाखांहून अधिक महिलांचा लाभ बंद झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील ५३ महिलांनी आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणार असल्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करावा, अशी मागणी योजनेच्या संकेतस्थळावर केल्याची बाब समोर आली आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. सुरवातीला अर्ज केलेल्या सर्वच महिलांना लाभ दिला गेला, पण अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आल्याने अपात्र लाभार्थीच्या शोधासाठी निकषांच्या आधारे पडताळणी सुरू केली. त्यात सद्य:स्थितीत दहा लाखांवर महिला अपात्र ठरल्या आहेत. आता आयकर विभागाकडून माहिती मागविण्यात आली असून माहिती प्राप्त होताच वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या महिलांचेही लाभ बंद होणार आहेत. त्यामुळे अनेक महिलांना आपला लाभ सुरू राहील की बंद होईल, अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. दुसरीकडे नव्याने पात्र झालेल्या महिलांना अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्याचे अर्ज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे २०२५ पर्यंतचा लाभ महिलांना मिळाला असून जून महिन्याचा लाभ लवकरच लाभार्थीच्या खात्यात जमा होईल. सोलापूर जिल्ह्यातील अनेक महिलांनी विविध कारणास्तव लाभ नाकारला आहे. काहींनी आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करा म्हणूनही अर्ज केले आहेत.
– रमेश काटकर, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर
लाभ बंद करा म्हणण्यामागील कारणे….
निकषांच्या आधारे पडताळणीत अपात्र होण्याची भीती
अपात्र ठरल्यावर पूर्वीच्या लाभाची रक्कम वसूल होण्याची भीती
दीड हजार रुपयांच्या लाभात वाढ होण्याची आशा मावळली
दरमहा २५ तारखेपर्यंत लाभ मिळेल अशी आशा, पण वेळेत मिळत नाही लाभ

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *